केएलईतर्फे हृदयाघातावेळी सीपीआर देण्याचे प्रशिक्षण
बेळगाव : हृदयाघाताच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केएलईमधील तज्ञ डॉक्टरांकडून पोलीस अधिकाऱ्यांना सीपीआरचे प्रशिक्षण देण्यात आले. पोलीस मुख्यालयात शहरातील अधिकारी व पोलिसांना यासंबंधीची माहिती देण्यात आली. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त एन. व्ही. बरमणी, एसीपी जे. रघू, एसीपी सदाशिव कट्टीमनी आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात डॉ. संजय राव, डॉ. श्रीधर बाळीगा, डॉ. आरती निली, डॉ. स्नेहलता नार्वेकर, महांतेश इंचल, डॉ. कैरव आदींनी पोलीस अधिकाऱ्यांना हृदयाघाताच्या वेळी दिल्या जाणाऱ्या प्रथमोपचाराबद्दल प्रशिक्षण दिले. कर्नाटकात हृदयाघाताच्या वाढत्या संख्येमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. पोलीस दलातील अनेकांना लहान वयातच हृदयाघात झाल्याची उदाहरणे आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य रक्षणासाठी केएलई संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळातील तज्ञ डॉक्टरांनी पोलिसांना मार्गदर्शन केले. पोलीस दलातील वाहनचालकांचीही बैठक घेऊन मानसिक ताणतणाव नियंत्रण करण्याबरोबरच वाहने चालविण्यासंबंधी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.









