मातृभाषेतून शिक्षण घेण्याकडे पालक-विद्यार्थ्यांचा कल
वार्ताहर/मच्छे
गेल्या दोन-तीन वर्षांपासून मच्छे येथील बाल शिवाजी वाचनालय व म. ए. युवा समितीतर्फे मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबविण्यात आले. याचीच परिणिती म्हणून मच्छे गावातील मराठी प्राथमिक शाळेत यंदा पहिलीच्या वर्गात तब्बल 52 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. कोणतेही ज्ञान अवगत करण्यासाठी मातृभाषेतून घेतलेले शिक्षण हे अधिक प्रभावी असते, याची प्रचिती गेल्या तीन-चार वर्षांपासून पालकवर्गाला होत आहे. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण घेण्याकडे पालक व विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल व मातृभाषेतील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास होतो. यासाठी गेल्या 3-4 वर्षांत गावातील बाल शिवाजी वाचनालयातर्फे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामस्थांना वेळोवेळी मातृभाषेचे महत्त्व पटवून देण्यात आले. वाचनालयामध्ये विद्यार्थी व पालकांना मराठी भाषा व संस्कृतीसाठी दरवर्षी व्याख्याने आयोजित केली जातात. सामाजिक, राजकीय, जागतिक घडामोडी समजण्यासाठी चांगल्या वक्त्यांची भाषणे आयोजित करण्यात येतात. याला गावातील पालकांनी व विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे भाषेवरचे प्रेम वाढत आहे. त्यामुळेच मराठी शाळेत पटसंख्याही आता वाढत आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शैक्षणिक साहित्याची मदत व दरवर्षी भरविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमुळे पालकांचा कल पुन्हा मराठी शाळांकडे वळला आहे. आज कितीतरी गावातील मराठी शाळा बंद होत चालल्या आहेत. त्या टिकविण्यासाठी यांचे सतत प्रयत्न चालू असतात. मच्छे गावात वाढलेली पटसंख्या ही बाल शिवाजी वाचनालय तसेच मराठीप्रेमींनी केलेल्या कार्याची पोचपावती असून भविष्यातसुद्धा मराठी शाळेच्या भरभराटीसाठी तसेच गुणवत्ता वाढीसाठी वाचनालयाचे पदाधिकारी प्रयत्नशील राहणार आहेत.









