अमृतसरमध्ये 40 ट्रॅव्हल एजंटचे परवाने रद्द
अमृतसर:
अमेरिकेतून डिपोर्ट होत भारतात पोहोचलेल्या भारतीय नागरिकांच्या प्रकरणी पंजाब सरकार सातत्याने कारवाई करत आहे. प्रशासनाने सोमवारी याप्रकरणी अमृतसरमध्ये ट्रॅव्हल एजंट्सच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. अमृतसरमधील 40 ट्रॅव्हल एजंट्सचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून पंजाब पोलिसांच्या विशेष तपास पथकाने लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अवैध इमिग्रेशन नेटवर्कच्या विरोधात मोठी कारवाई चालविली आहे. अमेरिकेतून डिपार्ट करत अमृतसर येथे पाठविण्यात आलेल्या भारतीय नागरिकांशी संबंधित ही कारवाई होती. पंजाब पोलिसांनी पीडितांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. याच्या आधारावर काही ट्रॅव्हल एजंट्सनी त्यांना अवैध मार्गाने अमेरिकेत प्रवेश मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देत आर्थिक फसवणूक केली होती. या तक्रारींच्या आधारावर पोलिसांनी एकूण 8 एफआयआर नोंदविले आहेत. अमेरिकेतून पनामा येथे पाठविण्यात आलेल्या 12 भारतीय नागरिकांना घेऊन एक विमान रविवारी संध्याकाळी नवी दिल्लीतील विमानतळावर पोहोचले. पनामातून आणल्या जाणाऱ्या भारतीयांची ही पहिली तुकडी होती.









