ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरूवात झाली. सकाळी 9 वाजेपर्यंत कसबा मतदारसंघात 6.5 टक्के तर चिंचवड मतदारसंघात 3.52 टक्के मतदान झाले.
सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या आहेत. सकाळी ऊन कमी असल्याने ज्येष्ठ नागरिकांसह महिलांनीही मतदानासाठी गर्दी केली असून, त्या मतदानाचा हक्क बजावत आहेत. दुपारचा उन्हाचा पारा पाहता मतदानाचा वेग मंदावेल. ऊन कमी झाल्यानंतर पुन्हा मतदार मतदानासाठी घराबाहेर पडतील.
कसबा मतदारसंघात 270 मतदान केंद्रांवर 2 लाख 75 हजार 428 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर चिंचवड मतदार संघामध्ये एकूण 5 लाख 68 हजार 954 मतदार असून, 510 मतदार केंद्रावर मतदान होत आहे.








