पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे स्वातंत्र्यदिनी प्रतिपादन
प्रतिनिधी/ बेळगाव
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने अनेक जनोपयोगी योजना राबविल्या आहेत. सामाजिक न्याय व समानतेसाठी दृढ पावले टाकण्यात येत आहेत. बेळगाव जिल्हा प्रशासनाचे कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी शंभर कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे. जिल्ह्यात विविध योजनांतर्गत रस्ते व पूल बांधण्यासाठी गेल्या दोन वर्षात 1 हजार 815 कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे.
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्वातंत्र्यदिनी ही माहिती दिली. जिल्हा क्रीडांगणावर राष्ट्रध्वज रोहणानंतर बोलताना पालकमंत्र्यांनी संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेतला. सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 215 कोटी रुपयांच्या योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच कार्यादेश देण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, क्रीडा, वैद्यकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये आपला देश जगात आघाडीवर आहे. बेळगाव जिल्ह्याने स्वातंत्र्यलढ्यासाठी मोठे योगदान दिले आहे. अनेक स्वातंत्र्यसैनिक व लढवय्ये या जिल्ह्याने देशाला दिले आहेत. स्वातंत्र्यलढ्यातही आपला जिल्हा आघाडीवर होता, असे सांगत पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण केले.
देशाची एकता व अखंडता यांचे संरक्षण झाले पाहिजे. भावी पिढीला विकास व स्वातंत्र्याचे महत्त्व समजावून सांगण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असे सांगतानाच सतीश जारकीहोळी यांनी देशासाठी त्याग केलेल्या महात्म्यांचे सदैव स्मरण केले पाहिजे, याकडे लक्ष वेधले. जिल्ह्यातील 125 तलाव भरणीचे उद्दिष्ट आहे. सध्या पाच तलाव भरण्याचे काम प्रगतिपथावर आहे. तलाव भरणीसाठी 316 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मनरेगा योजनेंतर्गत चालू वर्षी 1 कोटी 15 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट होते. यापैकी 44 लाख 19 हजार रोजगार निर्मिती पूर्ण झाली आहे, असे सांगत सतीश जारकीहोळी यांनी जिल्ह्यातील विकासाचा आढावा घेतला.
पोलीस, अग्निशमन दल, गृहरक्षक दल, अबकारी, पालिका कर्मचारी, एनसीसी, भारत सेवा दल व विविध शाळांतून आलेल्या विद्यार्थ्यांचे जिल्हा क्रीडांगणावर आकर्षक पथसंचलन झाले. यावेळी सेंद्रिय शेती या विषयात तुकाराम नाईक, लक्ष्मी लोकूर, समाजसेवा विभागात डॉ. सुशीलादेवी रामण्णावर, शैक्षणिक विभागात तन्वी पाटील, रूपा पाटील व क्रीडा विभागातील विविध साधकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार राजू सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, पोलीस उपायुक्त नारायण बरमणी यांच्यासह अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हा क्रीडांगणावर पोहोचण्याआधी पालकमंत्र्यांनी संगोळ्ळी रायण्णा व राणी कित्तूर चन्नम्मा यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केले.









