सुदैवाने वाचला जीव
वृत्तसंस्था/ पतियाळा
प्रख्यात शीख विचारवंत बाबा बख्शीश सिंह यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. 3 वाहनांमधून आलेल्या गुंडांनी त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी बाबा बख्शीश सिंह यांच्यावर गोळीबार केला आहे. बख्शीश सिंह हे चंदीगड येथून पतियाळाच्या दिशेने प्रवास करत असताना हा प्रकार घडला आहे.
तीन वाहनांनी सिंह यांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला होता. यादरम्यान एक वाहन पुढे आणि दोन वाहनांनी मागे राहत त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. बख्शीश सिंह यांच्या वाहनचालकाने तेथून निसटण्याचा प्रयत्न केला असता समोरील वाहनात बसलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. सुदैवाने ही गोळी कुणाला न लागल्याने जीवितहानी टळली.
बख्शीश सिंह पूर्णपणे सुरक्षित असून गोळीबार प्रकरणी गुन्हा नोंद करत पुढील कारवाई केली जात असल्याचे पोलीस अधीक्षक मोहम्मद सरफराज आलम यांनी सांगितले आहे. तर बख्शीश सिंह यांनी हल्ल्यानंतर पतियाळा येथील सेफ हाउसमध्ये असून पोलीस त्यांच्याकडून हल्ल्यासंबंधी अधिक माहिती जाणून घेत आहेत.









