बिहारचे दोघे जखमी, गोमेकॉत उपचार सुरू : कानाला, दंडाला गोळी लागल्याने रक्तस्राव, हल्लेखोरांना अटक करण्यात पोलिसांना अपयश
पेडणे : उगवे येथे रेती उपसा करणाऱ्या बिहारी कामगारांवर सोमवारी मध्यरात्रीनंतर बंदुकीची गोळी झाडल्याने दोन कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बांबोळी येथे गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असली तरी काल मंगळवारी रात्री उशिरापर्यंत कोणालाही पकडण्यात यश आले नव्हते. उगवे येथे तेरेखोल नदीपात्रातून रेती उपसा करणाऱ्या दोन रेती कामगारांवर गोळीबार करण्यात आल्याने या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बंदुकीने गोळी झाडल्याने सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या गोळीबारात जखमी झालेले दोन्ही कामगार हे मूळ बिहार राज्यातील आहेत. त्यांच्यावर गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू असल्याची माहिती पेडणे पोलिस निरीक्षक सचिन लोकरे यांनी दिली.
दंडाला गोळी लागून जखमी
बंदुकीच्या गोळीने जखमी झालेल्यांची नावे रमेश पासवान व लालबहादुर गौंड अशी आहेत. गोळीबारात रमेश पासवानच्या मानेला घासून बंदुकीची गोळी गेली तर लालबहादुर गौंड याच्या दंडाला गोळी लागल्याने रक्तस्राव होत आहे. लालबहादुर याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया झाली असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने तालुक्यात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. पेडणे पोलिस निरीक्षक लोकरे आणि त्यांच्यासोबत इतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पेडणे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात शस्त्र कायदा 109 बी एन एस 3/आर डब्ल्यू 25 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
वारंवार तक्रारी करुनही सरकारी यंत्रणांचे दुर्लक्ष
गेल्या अनेक वर्षांपासून तेरेखोल नदीत मोठ्या प्रमाणात रेती उपसा सुरू आहे. तोरसे, उगवे, नईबाग, पोरसकडे तसेच अन्य भागातही मोठ्या प्रमाणात रेती उपसा बेकायदेशीरपणे सुरू असल्याच्या तक्रारी त्या त्या भागातील नागरिक तसेच नदी परिसरातील शेतकरी आणि बागायतदारांनी वारंवार सरकारी यंत्रणांकडे केलेल्या आहेत. तरीही सर्वच सरकारी यंत्रणांनी दुर्लक्ष केले आहे.
रेती व्यवसायामुळे शेतकरी, बागायतदारांचे नुकसान
उगवे परिसरात मोठ्या प्रमाणात शेतमळे आणि बागायती या रेती व्यवसायामुळे नदीने गिळंकृत केल्या आहेत. या नदीचे पात्र पूर्वी अऊंद होते, मात्र बेसुमार रेती उपसा केल्याने नदीकाठाची जमीन कोसळून पाण्यात गेल्याने आता हे पात्र मोठ्या प्रमाणात ऊंद झाले आहे. शेतमळ्याची जमीन नदीत कोसळल्याने अनेकांचे शेतमळे आणि बागायती नष्ट झाली आहे. चांगली शेतजमीन पाण्यात कोसळल्याने शेतकऱ्यांचे, बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांकडून वारंवार तक्रारी
याबाबत शेतकऱ्यांकडून वारंवार तीव्र संताप व्यक्त होत असतो. सरकारी यंत्रणेकडे अनेकवेळा तक्रारी करूनही या बेकायदेशीर रेती व्यवसायाला कोणीही आळा घालू शकलेले नाहीत. यामुळे स्थानिक नागरिक आणि रेती व्यवसायातील कामगार यांच्यात अधूनमधून दगडफेकीचे किंवा अन्य प्रकारे विरोध करण्याचे प्रकार घडतात. मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिल्याने पेडणे पोलिसांनी हल्लेखोरांना शोधण्यासाठी कडक पावले उचललेली आहेत. संशयितांना तात्काळ अटक करून तुऊंगात टाकले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
पेडणे पोलिसांसमोर आव्हान
रेती कामगारांवर बंदुकीने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करणाऱ्यांना पकडण्याचे पेडणे पोलिसांसमोर आव्हान असून बंदुकीने हल्ला करणे म्हणजेच शस्त्र कायद्याचे उल्लंघन करून हा हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था याचा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकारात लक्ष दिल्याने आता पेडणे पोलिसांसमोर हल्लेखोरांना पकडण्याचे आव्हान आहे.
रेती कामगारांवरील हल्ला दुर्दैवी : कोरगावकर
रेती कामगारांवर हल्ला हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. आज सर्वत्र रेती व्यवसाय सुरू आहे. मात्र बेकायदेशीर रेती व्यवसाय असल्याने त्यावर निर्बंध येतात. सरकारने जर हा व्यवसाय कायदेशीर केला असता तर हा प्रकार घडला नसता. या व्यवसायावर अनेक कुटुंबे अवलंबून असल्याने सरकारने याबाबत या अगोदरच भूमिका घेऊन या व्यवसायाला मान्यता द्यायला हवी होती. मात्र ते न झाल्याने अशा प्रकारची घटना आज घडली आहे, असे मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर म्हणाले.









