वृत्तसंस्था/ अमृतसर
अमेरिकेतून नुकताच भारतात परतलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांवर दोन अज्ञातांनी घरात घुसून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना पंजाबमध्ये घडली आहे. शनिवारी अमृतसरमध्ये हा हल्ला झाला. सुखचैन सिंह असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांना ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही गोळीबाराची घटना सीसीटीव्ही पॅमेरातही कैद झाली असून हल्ल्यानंतर भयभीत झालेली मुले रडताना दिसत आहेत.
गोळीबाराच्या घटनेनंतर सुखचैनसिंग यांच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी अमृतसर पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच हा हल्ला सुखचैनसिंग यांच्या पहिल्या पत्नीच्या नातेवाईकांनी केल्याचा आरोप त्यांच्या आईने केला आहे. कुटुंबीयांच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी तपास करत असल्याचे सांगितले. पंजाब सरकारमधील मंत्री कुलदीप दहिवाल यांनी ही घटना वैयक्तिक वादातून घडल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही या घटनेची सखोल चौकशी करत आहोत. या प्रकरणी गुन्हाही नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे, असे ते म्हणाले. तसेच अनिवासी भारतीयांचे काही वैयक्तिक वाद असतील तर त्यांनी चर्चेतून सोडवावे, असे आवाहनही त्यांनी केले.









