शिरवळ :
शिरवळ (ता. खंडाळा) शहराच्या मुख्य बाजारपेठेत मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात मिनाज इक्बाल शेख (रा. शिरवळ) याच्या हाताला गोळी चाटून गेल्याने तो किरकोळ जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेनंतर गोळीबार करणारे संशयित घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी तरुण एका फायनान्स कंपनीच्या ऑफिसच्या बिल्डिंगखाली आपल्या मित्रांसमवेत गप्पा मारत उभा होता. त्यावेळी दुचाकीवरून दोन हल्लेखोरांनी येऊन तरुणाच्या दिशेने गोळीबार केला. एक गोळी मिनाज शेख यांच्या हाताला चाटून गेल्याने ते किरकोळ जखमी झाले. गोळीबाराचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. गोळीबार केल्यानंतर संशयित घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता दोघे जण गोळीबार करून पळून गेल्याचे दिसत आहे. ही घटना पूर्ववैमनस्यातून घडली असल्याची चर्चा आहे. अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी घटनास्थळी भेट दिली.








