एकास अटक , दोघांच्या मागावर पोलीस
मडगाव : रायतळे कुडतरी येथे परिसरात एका घराच्या दिशेने गोळी झाडण्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. मात्र या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. प्राथमिक माहितीनुसार याप्रकरणी तिघेजण संशयित असून पोलिसांनी त्यापैकी एक असलेला नीलेश वेर्णेकर नावाच्या एका संशयिताला अटक केली आहे. मध्यरात्रीच्या सुमाराला गोळी झाडल्यानंतर संशयितांनी घटनास्थळाहून पळ काढल्याची माहिती पोलीस सूत्रानी दिली. कॉन्झी नावाच्या एका व्यक्तीच्या घराजवळील जागा विकसीत करण्याची प्रकिया चालू असून या बांधकामाविरोधात कॉन्झी यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. याच जागेत खासगी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले असून हे सुरक्षारक्षक वेर्णेकर याच्या सुरक्षा एजन्सीचे आहेत. त्यातील एका सुरक्षारक्षकाला मंगळवारी मारहाण करण्यात आली होती आणि त्यातूनच गोळी झाडल्याचे प्रकरण घडले असावे, असा कयास पोलिसानी व्यक्त केला आहे. प्राप्त माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी उशिरा नीलेश वेर्णेकर याला अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा केलेले असून त्याच आधारे पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील इतर दोन संशयितांच्या मागावर पोलीस असल्याची माहिती पोलिसांनी दिली.









