आसाम रायफल्सचे दोन जवान जखमी : उपचारासाठी केले एअरलिफ्ट
वृत्तसंस्था/ इम्फाळ
मणिपूरमध्ये सोमवारी झालेल्या हिंसेत जखमी बीएसएफ जवानाच मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 5 मे रोजी शोधमोहिमेदरम्यान समाजकंटक अन् जवानांदरम्यान गोळीबार झाला होता, यात बीएसएफ जवान जखमी झाला होता. तसेच आसाम रायफल्सचे दोन जवानही जखमी झाले आहेत. या दोन्ही जवानांना एअरलिफ्ट करत मंत्रीपुखरी येथे हलविण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आली.
राज्यात कूकी आणि मैतेई समुदायादरम्यान 3 मेपासून हिंसा सुरू आहे. या हिंसेत आतापर्यंत 98 जणांना जीव गमवावा लागला असून 310 जण जखमी झाले आहेत. तर 37 हजारांहून अधिक जणांना मदतशिबिरांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. हिंसेमुळे राज्यातील 11 जिल्हे प्रभावित झाले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप संचारबंदी लागू आहे.
तत्पूर्वी सोमवारी भडकलेल्या हिंसेत काकचिंग जिल्ह्dयातील सेरो गावात काही लोकांनी 100 घरांना पेटवून दिले होते. यात काँग्रेस आमदार रंजीत सिंह यांचे निवासस्थान देखील सामील आहे. केंद्रीय अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर सुरक्षा दलांकडून राज्यात शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. 5 मे रोजी 790 शस्त्रास्त्रs आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा हस्तगत करण्यात आला होता. ही शस्त्रास्त्रs 3 मे रोजी भडकलेल्या हिंसेदरम्यान पोलिसांकडून लुटण्यात आली होती.
इंटरनेट बंदीविरोधात याचिका
हिंसा प्रभावित मणिपूरमध्ये इंटरनेट सेवा रोखण्याच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील चोंगथम व्हिक्टर सिंह आणि उद्योजक मेयेंगबाम जेम्स यांनी ही याचिका दाखल केली आहे. राज्यव्यापी इंटरनेट बंदमुळे जीवन अन् उपजीविका प्रभावित झाली आहे. लोकांचे दैनंदिन जीवन आणि त्यांच्या मूलभूत अधिकारांना हा निर्णय नुकसान पोहोचवित असल्याचे याचिकेत म्हटले गेले आहे.
3 सदस्यीय आयोग स्थापन
मणिपूरमधील हिंसेच्या चौकशीसाठी 3 सदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे. या आयोगाचे अध्यक्षत्व गुवाहाटी उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश अजय लांबा करणार आहेत. मणिपूरमधील हिंसेचे कारण अन् दंगलीचा तपास करणार आहे. तसेच 6 महिन्यांच्या आत स्वत:चा अहवाल सादर करणार आहे.