भाजपचे 23 आमदार स्वतंत्र प्रशासनाच्या विरोधात : संकल्पपत्रावर नाही मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी
वृत्तसंस्था/ इम्फाळ
मणिपूरच्या कांगपोकपीमध्ये मंगळवारी झालेल्या गोळीबारात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी कांगगुई भागातील इरेंग आणि करम वैफेई गावादरम्यान सकाळी सुमारे 8.20 वाजता ग्रामस्थांवर बेछूट गोळीबार केला, यात 3 जणांना जीव गमवावा लागला आहे.
यापूर्वी 8 सप्टेंबर रोजी टेंग्नौपालच्या पल्लेलमध्ये हिंसा भडकली होती आणि तेथे 3 जण मारले गेले होते. तर 50 हून अधिक जण जखमी झाले होते. मणिपूरमध्ये 3 मेपासून कुकी आणि मैतेई समुदायादरम्यान सुरू असलेल्या वादामुळे आतापर्यंत 160 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे.
तर दुसरीकडे राज्यातील भाजपच्या 23 आमदारांनी मंगळवारी एक प्रस्ताव संमत केला असून यात त्यांनी 10 कुकी आमदारांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. कुकी आमदार राज्यात वेगळ्या प्रशासनाची मागणी करत आहेत. भाजप आमदारांनी या प्रस्तावावरून मुख्यमंत्री एन. विरेन सिंह यांची भेट देखील घेतली आहे.
एनआरसी लागू करण्याची मागणी
अलिकडेच स्थापन सिव्हिल सोसायटी संघटना यूथ ऑफ मणिपूरने सोमवारी रात्री भाजप आमदारांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या संघटनेने स्वतंत्र प्रशासनाची मागणी करणाऱ्या 10 कुकी आमदारांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. तसेच याप्रकरणी चर्चेसाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याची आणि राज्यात एनआरसी लागू करण्याची मागणी केली आहे.









