वकिलांच्या दोन गटात वाद झाल्यानंतरची घटना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात गोळीबाराचे प्रकरण समोर आले आहे. वकिलांच्या दोन गटात वादावादी झाल्यानंतर एका वकिलाने गोळीबार केला. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. सुरक्षेचे निकष असतानाही हे शस्त्र न्यायालयात कसे पोहोचले, याचा तपास पोलीस करत आहेत. दिल्लीतील न्यायालय परिसरात गोळीबाराची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी 21 एप्रिल रोजी दिल्लीतील साकेत येथे न्यायालयात हजर असलेल्या एका महिलेवर वकिलाच्या वेशातील एका व्यक्तीने गोळीबार केला होता.
तीस हजारी न्यायालयात बुधवारी दुपारी 1.35 च्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. पदाधिकाऱ्यांसह वकिलांच्या दोन वेगवेगळ्या गटांनी हवेत गोळीबार केल्याचे दिसून आले. या घटनेचा आणखी एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये एक वकील बंदुकीत काडतुसे भरल्यानंतर गोळीबार करताना दिसत आहे. सदर व्हिडिओ पॅम्पसमध्ये उपस्थित असलेल्या एका वकिलानेच रेकॉर्ड केला होता.
बार कौन्सिल ऑफ दिल्लीचे अध्यक्ष के. के. मनन यांनी तीस हजारी न्यायालयाच्या आवारात झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा निषेध केला. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. गोळीबार करण्यात आलेल्या शस्त्राला परवाना होता की नाही, याची खातरजमा केली जाईल. शस्त्राचा परवाना असला तरी, कोणताही वकील किंवा अन्य व्यक्ती न्यायालयाच्या परिसरात किंवा आजूबाजूला त्यांचा वापर करू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.









