लष्कर-दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच : अतिरिक्त फौजफाट्यासह कडक सुरक्षा यंत्रणा तैनात
संघर्ष…
- अनंतनागमध्ये लष्कराची कारवाई तीव्र
- सुरक्षा दलांच्या मदतीसाठी पाठवले ड्रोन
- संघर्षात कर्नल, मेजर, डीएसपी हुतात्मा
- हुतात्मा अधिकाऱ्यांना अखेरचा निरोप
वृत्तसंस्था /अनंतनाग
अनंतनाग जिल्ह्यात लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती गुरुवारी जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली. या कारवाईदरम्यान गुरुवारीही गोळीबार झाल्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. बुधवारी या भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे तीन अधिकारी हुतात्मा झाले होते. कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धौनक आणि डीएसपी हुमायून भट या तिघांना हौतात्म्य प्राप्त झाल्यानंतर लष्कराची विविध पथके दहशतवाद्यांना घेरण्याच्या निर्धाराने काम करत आहेत.
काश्मीरमध्ये सध्या लष्कर-ए-तोयबाच्या प्रतिबंधित रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी गटाकडून कुरापती सुरू आहेत. नुकत्याच्या झालेल्या चकमकीची जबाबदारी या गटाने स्विकारली आहे. यापूर्वी या संघटनेच्या सदस्यांनी 4 ऑगस्ट रोजी कुलगाम जिह्यातील हलान जंगल परिसरात लष्कराच्या जवानांवर हल्ला केला होता. या चकमकीत हुतात्मा झालेल्या अधिकाऱ्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आले असून त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
अनंतनाग जिह्यातील कोकरनाग भागातील गडोले भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 19 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर, एक मेजर रँकचे अधिकारी आणि एक पोलीस उपअधीक्षक हुतात्मा झाल्यानंतर भारतीय सुरक्षा दल अधिक सतर्क झाले आहे. दोन महिन्यांच्या मुलीचे वडील आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे निवृत्त महानिरीक्षक गुलाम हसन भट यांचा पुत्र हुमायून भट यांचा अतिरक्तस्रावामुळे मृत्यू झाला. पोलीस महासंचालक (डीजीपी) दिलबाग सिंग यांनी शूर पोलीस आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या बलिदानाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पाकिस्तानला हवाई हल्ल्याची भीती
जम्मू-काश्मीर भागात घुसखोरी वाढवण्यासाठी पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळील आपले सर्व दहशतवादी तळ आणि लॉन्च पॅड हलवले आहेत. या दहशतवादी छावण्यांमध्ये लष्कर-ए-तोयबा (एलईटी), जैश-ए-मोहम्मद (जेएम) आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे दहशतवादी कार्यरत असल्याचे समजते. गुप्तचर माहितीनुसार, सर्व लॉन्च पॅडवर प्रशिक्षित दहशतवादी असून ते पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सद्वारे विविध छुप्या कारवायांमध्ये गुंतलेले आहेत. एलओसीवर दहशतवाद्यांचा एक मोठा प्रशिक्षित गट सक्रीय असून बहुतेकांना अफगाणिस्तानातील तालिबानने पाकिस्तानात परतण्यास भाग पाडले आहे. हे दहशतवादी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यास तयार होते, असे भारतीय गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे.









