संशयित दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम सुरू
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिह्यातील डोंगराळ भागात लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी पहाटे चकमक-गोळीबार झाला. सुरुवातीच्या हल्ल्यानंतर पळून गेलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक शोधमोहीम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर दिल्यामुळे दहशतवादी घनदाट जंगलात पळून गेले. या कारवाईमध्ये दोन्ही बाजूंनी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कठुआच्या बटोद पंचायतीतील तात्पुरत्या लष्करी छावणीवर मध्यरात्री 1:20 वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर हाती घेण्यात आलेल्या शोधमोहिमेत संशयास्पद दहशतवादी हालचाली दिसून आल्या. शोध मोहिमेवेळी सैनिकांनीही गोळीबार करत दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी सुमारे अर्धा तास अधूनमधून गोळीबार सुरू राहिला.









