नौदलाच्या हेलिकॉप्टरद्वारे मारला पाण्याचा फवारा : अग्निशामक, नौदल, वन खात्याची संयुक्त मोहीम,पिसुर्ले खंदकातील वापरले पाणी

उदय सावंत/चोर्ला
गेल्या तीन दिवसांपासून सत्तरी तालुक्यातील चरारावणे व साट्रे डोंगरावर आगीचा भडका उडाल्यानंतर सरकारची यंत्रणा हतबल झाली होती. मात्र सोमवारी संध्याकाळपासून आग विझविण्याच्या कामाला युद्धपातळीवर सुऊवात करण्यात आल्यानंतर जवळपास 90 टक्के आग विझविण्यात आलेली आहे. मंगळवारी नौदलाच्या हेलिकॉप्टरद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे काम संपुष्टात आले असतानाच केरी भागातील मिरयाचो डोंगर आणि वदीर डोंगर यांना आग लागून मोठ्या प्रमाणात काजूची नुकसानी झालेली आहे. मोर्ले डोंगरावरही मंगळवारी आग लागली. कर्नाटकातील पारवड भागातून आग गोव्याच्या दिशेने येत असताना वनरक्षकांनी ती आग विझविण्यात यश मिळविले.

पिसुर्ले खंदकातील वापरले पाणी
सोमवारी संध्याकाळी वनमंत्री विश्वजित राणे यांनी चोर्ला भागात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. मंगळवारी सकाळपासून नौदलाच्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली. दोन हेलिकॉप्टर्स आग विझवण्याचे काम करीत होती. दोन्ही हेलिकॉप्टर्सनी चरावणे, चोर्ला, साट्रे डोंगरावरील आग विझविली. पिसुर्ले येथील खनिज खंदकामध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या पाण्याचा वापर या हेलिकॉप्टरमध्ये भरण्यासाठी करण्यात आला. तेथून पाणी भरून हेलिकॉप्टर्सद्वारे ते डोंगरावर शिंपडून आग विझविण्यात आली.
पारवडहून येणारी आग रोखली : जाधव
सोमवारी दुपारपासून पारवड भागातून आगीचा वणवा गोव्याच्या दिशेने येत होता. तो वणवा गोव्dयात पोहोचल्यास गोव्याला मोठा धोका होता. यामुळे वनाखात्याच्या कर्मचाऱ्यांना त्याठिकाणी नियुक्त करण्यात आले होते. सोमवारी रात्री व मंगळवारी दिवसभर या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले. त्याठिकाणी पिकपमधून पाण्याची व्यवस्था करून पारवडमधून येणाऱ्या आगीला रोखण्यात आले, आता भीती नाही, अशी माहिती उप वनवालपाल आनंद जाधव यांनी दिली.
मिरयाचो डोंगरावर पुन्हा भडकली आग
केरी येथील मिरयाचो डोंगरावरील आगीने मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा उग्ररुप धारण केले. यामुळे काजू बागायतीची मोठी नुकसानी झालेली आहे. वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत काजुची झाडे करपून गेली होती. वासुदेव विठ्ठल गावस, अर्जुन येसो माजीक, गणेश बाबलो माजीक, गोपाळ बामनो माजीक यांच्या काजूच्या बागायती जळाल्या आहेत. मामलेदार दशरथ गावस यांनी सांगितले की नुकसानीसंदर्भाचे सर्वेक्षण तलाठ्यामार्फत करण्यात आलेले आहे. सविस्तर पंचनामा करून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे.
मोर्ले डोंगरावर नव्याने भडकली आग
उशिरा मिळालेल्या माहितीनुसार मोर्ले डोंगरावर नव्याने आग लागल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. ही आग स्पष्टपणे दिसत असून वनखात्याची यंत्रणा त्या ठिकाणी उशिरा पोहोचलेली आहे. मात्र काळोख झाल्यामुळे आग विझवण्याचे काम हाती घेणे शक्य नाही. यामुळे बुधवार सकाळपासून आग आटोक्यात आणण्याच्या कामाला सुऊवात करण्यात येणार आहे. ही आग डोंगराच्या माथ्यावर असल्यामुळे त्या ठिकाणी अग्निशामक दलाची यंत्रणा पोहोचणे शक्य होत नाही, अशी माहिती मिळाली आहे.









