सांबरा येथील विमानतळावर दिली माहिती
बेळगाव : अग्निवीर प्रशिक्षणार्थींना बेळगाव विमानतळ येथे अग्नी सुरक्षेविषयी प्रशिक्षण देण्यात आले. आपत्कालीन परिस्थिती तसेच आगीची घटना घडल्यानंतर कोणत्या उपाययोजना कराव्यात, याची माहिती प्रात्यक्षिकांसह प्रत्येक प्रशिक्षणार्थीला देण्यात आली. त्याचबरोबर विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यातील अत्याधुनिक आग विझविणाऱ्या बंबाची माहिती देण्यात आली. बेळगाव एअरमन ट्रेनिंग स्कूलमध्ये अग्निवीर प्रशिक्षण सुरू आहे. या प्रशिक्षणार्थींना शनिवारी बेळगाव विमानतळावर आणण्यात आले होते. अग्निसुरक्षेविषयी त्यांना माहिती व्हावी यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. सुरक्षा उपकरणे, त्यांचा वापर याची माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी अग्निवीर तसेच त्यांचे अधिकारी व अग्निशमन अधिकारी उपस्थित होते.









