तिसऱ्या रेल्वेगेटजवळील घटना
बेळगाव : नव्या घरासाठी पाया घालताना माती कोसळून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगाराला अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी ढिगाऱ्यातून वाचविले. बुधवारी दुपारी तिसऱ्या रेल्वेगेटजवळ ही घटना घडली आहे. जानी डिसोझा (वय 55) असे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगाराचे नाव असून त्याला मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढून उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी शिवाजी कोरवी, वाय. बी. वालीकार, मारुती पाटील, नजीरसाब पैलवान, कल्लाप्पा यळ्ळूरकर, सदाशिव बेन्नी, केदारी मालगार आदींनी ही कारवाई केली आहे. तिसऱ्या रेल्वेगेटजवळ नव्या घरासाठी पाया घालण्याचे काम सुरू होते. सेंट्रिंगचे काम करताना मातीचा ढिगारा अंगावर कोसळून कामगार ढिगाऱ्याखाली अडकला. बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनंतर तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यांनी मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगाराला सुखरूप बाहेर काढले.









