बेकायदा फटाके विक्रेत्यांवर कारवाई : परवानगी न घेता फटाक्यांची साठवणूक
बेळगाव : कर्नाटक-तामिळनाडूच्या सीमेवरील अत्तीबेले येथे गोदामात फटाके उतरविताना घडलेल्या आग दुर्घटनेत 15 जणांचा बळी गेल्यानंतर संपूर्ण राज्यात खबरदारी घेण्यात आली आहे. बेळगावातही पोलिसांनी बेकायदा फटाके विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. गणेशपूर येथे 9 लाखांचे फटाके जप्त करण्यात आले आहेत. शनिवार दि. 7 ऑक्टोबर रोजी दुपारी शिवकाशीहून दिवाळीसाठी आणलेले फटाके गोदामात उतरवताना आग दुर्घटना घडली होती. या घटनेत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. गुरुवारी सकाळी आणखी एका जखमीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सर्वत्र तपासणी सुरू करण्यात आली आहे. गणेशपूर येथील एका व्यापाऱ्याने मागवलेले वेगवेगळ्या प्रकारच्या फटाक्यांचे 31 बॉक्स कॅम्प पोलिसांनी बुधवारी रात्री जप्त केले आहेत. कॅम्पचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली असून यासंबंधी यश सुनील अस्वले (वय 21) या व्यापाऱ्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
फटाके साठविण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी तत्सम प्राधिकरणाकडून परवानगी न घेता आणि कोणत्याही प्रकारच्या सुरक्षिततेची काळजी न घेता फटाके साठविण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या दुकानातील 8 लाख 97 हजार 820 रुपये किमतीचे फटाके जप्त करण्यात आले आहेत. यासंबंधी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्याशी संपर्क साधला असता गणेशपूर येथील दुकानातून फटाके जप्त करण्यात आले आहेत. टिळकवाडी परिसरात एका लायसन्सधारकाचा मृत्यू झाला आहे. लायसन्सचीही मुदत संपली आहे. यासंबंधीही संबंधितांना माहिती देण्यात येत आहे. संपूर्ण शहरात तपासणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.









