वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताची राजधानी दिल्ली आणि भारताची आर्थिक राजधानी मुंबई येथे वायू प्रदूषणाची पातळी वाढल्याने तेथे होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांमध्ये फटाक्यांची आतषबाजी होणार नाही, असे घोषित करण्यात आले आहे. हा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतला असल्याची माहिती देण्यात आली.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या ऊर्वरित सामन्यांपैकी एक लीग सामना दिल्लीत होणार आहे, तर 2 लीग सामने मुंबईत होणार आहेत. दिल्लीत श्रीलंका विरुद्ध बांगलादेश हा सामना 6 नोव्हेंबरला होणार आहे. मुंबईत 2 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर या दोन दिवसांमध्ये दोन सामने होणार आहेत. हे सामने फटाकेमुक्त पद्धतीने खेळविण्याचा निर्णय झाला आहे. फटाके तसेच इतर दारुकामाची आतषबाजी यांच्यामुळे प्रदूषणाच्या पातळीत वाढ होते, असे दिसून आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.









