सिंगीनकोप येथील तेरा झोपड्या आगीच्या भक्षस्थानी, लाखोचे नुकसान
खानापूर : तालुक्यातील सिंगीनकोप येथील वीटभट्टी कामगारांच्या झोपड्यांना आग लागून 13 झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने लाखोचे नुकसान झाले आहे. यात संसारोपयोगी साहित्य, मोबाईल व रोख रक्कम जळून खाक झाली आहे. यामुळे वीटभट्टी कामगारांवर संकट कोसळले आहे. वीटभट्टी कामगार हे कबलापूर ता. बेळगाव येथील आहेत. आगीची माहिती मिळताच आमदार सतीश जारकीहोळी यांनी आपल्या सचिवाकडून तातडीने आर्थिक मदत पाठविली आहे. खानापूर तालुक्यात सर्वत्र वीट व्यवसाय जोरदार सुरू आहे. सिंगीनकोप येथील कृष्णा कुंभार यांच्या शेतात वीट तयार करण्याचे काम सुरू आहे. यासाठी वीट कामगारांनी झोपड्या घातल्या होत्या. बुधवारी सकाळी हे सर्व कामगार वीट तयार करण्यासाठी कामावर गेले असता अचानक एका झोपडीने पेट घेतला. त्यामुळे बाजूला लागून असलेल्या सर्व झोपड्यांनीही पेट घेतला. वीटभट्टी कामगार व शेतकऱ्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्याचा उपयोग झाला नाही.
आमदारांकडून मदत
सर्व 13 झोपड्या आगीत भस्मसात झाल्या. हे कामगार दरवर्षी सिंगीनकोप येथे वीटभट्टी कामासाठी येतात. या झोपड्यांमध्ये संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडेलत्ते, मोबाईल संच तसेच आपल्या पगाराचे पैसे त्यांनी या झोपडीत ठेवले होते. रोख रकमही या आगीत खाक झाल्याने कामगारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. आमदार सतीश जारकीहोळी यांनी आपल्या सचिवांकरवी तातडीची मदत पाठविली. वीटभट्टी मालक कृष्णा कुंभार यांनी सर्व कामगांराना संसारोपयोगी साहित्य व धान्य देऊन त्यांना मदत केली आहे.









