हैदराबादच्या हॉटेलमध्ये दुर्घटना ः धुरामुळे कोंडला गेला लोकांचा श्वास
वृत्तसंस्था / हैदराबाद
हैदराबाद शहरातील हॉटेलमध्ये सोमवारी रात्री आग लागली. या आगीच्या दुर्घटनेत 8 जणांना जीव गमवावा लागला. अग्निशमन दलाने वेगाने बचावमोहीम राबविली, परंतु धूर अधिक प्रमाणात असल्याने काही लोकांचा मृत्यू झाल्याचे शहराचे आयुक्त सी. व्ही. आनंद यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. शोकसंतप्त कुटुंबांबद्दल संवेदना क्यक्त करतो आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करत असल्याचे मोदींनी ट्विट करत म्हटले आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाख तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

हॉटेलच्या तळमजल्यावर इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्ज युनिट होता. इलेक्ट्रिक बाईक ठेवलेल्या ठिकाणीच ही आग लागल्याची माहिती पोलीस उपायुक्त चंदना दीप्ति यांनी दिली आहे. पहिल्या आणि दुसऱया मजल्यापर्यंत आग फैलावली होती. धुरात श्वास कोंडला गेल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी इमारत मालकावर गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलीस उपायुक्तांनी सांगितले आहे.
दुर्घटनेवेळी इमारतीत 25 जण होते. घटनास्थळावर उपस्थित अनेक लोकांनी हॉटेलमध्ये अडकून पडलेल्या लोकांना वाचविले आणि रुग्णालयात पोहोचविले. एका जखमीची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. जीव वाचविण्यासाठी काही लोकांनी खिडकीतून उडी घेतली होती.









