जवळपास 50 हजार रुपयांचे नुकसान
वार्ताहर /उचगाव
उचगाव येथील मेदरकी शेतवडीमध्ये ठेवलेल्या गवत गंजीला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत गवतगंजी जळून खाक झाली. यामध्ये जवळपास 50 हजार रुपयांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. ही घटना गुरुवार दि. 27 रोजी दुपारी घडली. उचगावमधील भरमा यल्लाप्पा होनगेकर यांनी आपल्या मेदरकी या शेतवडीमध्येच भाताच्या मळणीनंतर गवतगंजी घातली होती. गुरुवारी दुपारच्या वेळी या गवत गंजीवरूनच गेलेल्या विद्युत भारीत तारांमध्ये घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाले आणि त्याच्या ठिणग्या पडून या गवतगंजीने पेट घेतल्याचे होनगेकर यांच्याकडून सांगण्यात आले. पूर्ण गवतगंजीच जळून खाक झाल्याने वर्षभर जनावरांना चारा कोठून आणायचा, हा मोठा यक्षप्रश्न या शेतकऱ्यांसमोर पडला आहे. तरी हेस्कॉम खात्याने तातडीने याचा पंचनामा करून त्यांना आर्थिक साहाय्य द्यावे, अशी मागणी होनगेकर कुटुंब आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.









