बारा लाखांचे नुकसान; दोन बेकऱयांसह इडली सेंटर खाक
प्रतिनिधी/ कराड
मलकापूर (ता. कराड) येथील कृष्णा रुग्णालयासमोर तीन बेकरीच्या दुकानांना भीषण आग लागली. या भीषण आगीत तीन बेकऱयांमधील पदार्थांसह इतर साहित्याचे अंदाजे 12 लाखाचे नुकसान झाले. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न झाले. दरम्यान शॉर्टसर्किटने आग लागल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न होत आहे. मात्र अंतिम कारण स्पष्ट झालेले नाही.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथे सेवारस्त्यालगत तवटे मार्केट आहे. मार्केटच्या मध्यवर्ती भागात असलेल्या अंबिका स्वीट मार्टला मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणात आग वाढत गेल्याने खळबळ उडाली. लगत असलेल्या कृष्णा इडली सेंटरलाही आगीने विळखा दिला. ते जळून खाक झाले. तर बेंगलोर अय्यंगार बेकरीतील निम्मे साहित्य व माल जळाला. तिन्ही दुकानांचे सुमारे बारा लाखाचे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी याची माहिती पोलिसांनी देऊन कराड नगरपालिका, कृष्णा रूग्णालयाच्या अग्निग्नशामक दलाला पाचारण केले. अग्निग्नशामक दलाच्या गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले.
स्थानिक व्यावसायिक व नागरिकांनी सुद्धा आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. तीन अग्निग्नशामक दलाच्या गाडय़ांच्या माध्यमातून आग आटोक्यात आणायचे दीड तास शर्थीचे प्रयत्न सुरू होते. दुकानाचे शटर तोडून आत लागलेली आग आटोक्यात आणायचे प्रयत्न केला. घटनास्थळी फर्निचर, फ्रिज, कपाटे, टेबल खुर्च्या, फर्निचरचा आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. खाद्यपदार्थ व मिठाईचे साहित्य यांचे मोठे नुकसान झाले. या आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट निर्माण झाले होते. तसेच परिसरातील बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.









