रिअॅक्टरमध्ये झाला होता स्फोट
वृत्तसंस्था/ अनकापल्ली
आंध्रप्रदेशच्या अनकापल्लीमध्ये शुक्रवारी एका औषध कंपनीच्या प्रकल्पात आग लागली आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून 6 हून अधिक कर्मचारी जखमी झाले आहेत. अच्युतापुरम इंडस्ट्रियल स्पेशल इकोनॉमिक झोनमधील सहिथी फार्माच्या प्रकल्पात ही दुर्घटना घडली आहे.
सहिथी फार्मामधील एका रिअॅक्टरमध्ये स्फोट झाल्याने ही आग लागली आहे. कंपनीचे 6 कर्मचारी जखमी झाले असून यातील 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. सुमारे 15 कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलाच्या पथकाने बाहेर काढल्याची माहिती अनकापल्लीचे पोलीस अधीक्षक मुरली कृष्णा यांनी दिली आहे.
रिअॅक्टरमधील स्फोटानंतर आग त्वरित फैलावली, तेथून त्वरित बाहेर पडण्याची संधीच कुणाला मिळाली नसल्याचे कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने म्हटले आहे. आगीची तीव्रता अधिक असल्याने धूराचे लोट 5 किलोमीटर अंतरावरूनही दिसून येत होते.









