कॉलेज कॅम्पसमधील प्रकारानंतर हजारो विद्यार्थी रस्त्यावर : पोलिसांकडून लाठीमार
वृत्तसंस्था/ लाहोर
पाकिस्तानातील लाहोरमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कारानंतर खळबळ उडाली आहे. हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि हवेत गोळीबारही करावा लागला. या घटनेनंतर नागरिक संतप्त झाले असून हिंसाचार वाढण्याची शक्मयता आहे. लाहोरसोबतच अन्य शहरांमध्ये या घटनेविरोधात तीव्र आंदोलन छेडले जात असल्याने पाकिस्तानात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. बांगलादेशप्रमाणेच पाकिस्तानातही हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याने सध्या तणावग्रस्त भागातील शाळा, महाविद्यालयांना टाळे ठोकण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वी पंजाब ग्रुप्स ऑफ कॉलेजच्या विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली होती. या घटनेनंतर हजारो विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. महाविद्यालयाच्या इमारतीचीही तोडफोड करण्यात आली. फर्निचर जाळले. पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे तणाव आणखी भडकला. त्यानंतर इतर अनेक शहरांमध्येही निदर्शने होऊ लागली. या हल्ल्यात 30 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. 380 हून अधिक विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. परिस्थिती गंभीर झाल्याने संपूर्ण पंजाबमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच दोन दिवस सार्वजनिक मेळाव्यावर बंदी घालण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.
शाळा, महाविद्यालयांना टाळे
बांगलादेशसारखी परिस्थिती टाळण्यासाठी सरकारने तातडीने आंदोलने आणि रॅलींवर बंदी घातली. अनेक ठिकाणी फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. असे असतानाही विद्यार्थ्यांचा संताप थांबत नाही. ते अजूनही आंदोलन करत आहेत. शाळा, महाविद्यालयांना टाळे ठोकले आहेत. विद्यार्थ्यांच्या संतापाची आग इतर अनेक शहरांमध्ये धगधगत आहे. अफवा पसरवल्याबद्दल पोलिसांनी 50 हून अधिक लोकांना अटक केली आहे, तरीही शांतता निर्माण होताना दिसत नाही.
सोशल मीडियावरून अफवा
पंजाब सरकारच्या वकिलाने शुक्रवारी लाहोर उच्च न्यायालयात धाव घेत आतापर्यंत एकाही विद्यार्थिनीने बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला नसल्याचे निदर्शनास आणून दिले. सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळेच हे घडत आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांकडेही पुरावे नाहीत. दुसरीकडे, पोलिसांनी या प्रकरणी एका सुरक्षा रक्षकाला अटक केली असून त्याच्यावर विद्यार्थिनीच्या बलात्कारात सहभाग असल्याचा आरोप होत आहे. पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी बलात्काराच्या बातम्या ‘फेक’ असल्याचे म्हटले आहे.









