उत्तर मॅसेडोनियातील दुर्घटना : 100 हून अधिक जखमी : घटनेवेळी क्लबमध्ये 1,500 लोक उपस्थित
वृत्तसंस्था/ कोपजे
उत्तर मॅसेडोनियातील एका नाईट क्लबमध्ये रविवारी पहाटे भीषण आग लागली. या अग्नितांडवात किमान 51 जणांचा मृत्यू झाला. क्लबमध्ये एक संगीतमय कार्यक्रम सुरू असताना ही घटना घडली. या संगीत कार्यक्रमाला दीड हजारहून अधिक लोक उपस्थित होते. उत्तर मॅसेडोनियाची राजधानी कोप्जेपासून 60 मैल अंतरावर असलेल्या कोचनी शहरातील पल्स नाईट क्लबमध्ये आगीची ही घटना घडली. याप्रसंगी देशातील प्रसिद्ध हिप-हॉप जोडी डीएनकेचा संगीत कार्यक्रम येथे सुरू होता. संगीत कार्यक्रमादरम्यान वापरल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तथापि, अधिकाऱ्यांनी अद्याप याची पुष्टी केलेली नाही. या दुर्घटनेची सध्या उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे.
क्लबमधील अग्नितांडवाची घटना पहाटे 3 वाजता घडल्याचे सांगण्यात आले. काही क्षणातच नाईट क्लबचे छत आणि वरचा भाग आगीच्या ज्वाळांनी वेढला गेला. अचानक लागलेल्या या आगीमुळे घबराट पसरली. लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागले. या अपघातात 100 हून अधिक लोक जखमी झाले. जखमींना कोचनी आणि स्टिप येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्टिप हे कोचनीपासून सुमारे 20 मैल दक्षिणेस स्थित आहे.
या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान आणि वैद्यकीय पथके रात्रभर मदतकार्यात गुंतलेली होती. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतानाच अनेक जणांना वाचविण्याचाही प्रयत्न केला. यादरम्यान बचाव पथक जखमींना रुग्णालयात नेण्यात आणि मदतकार्य करण्यात व्यस्त होते.









