अल-कुत : इराकच्या अल-कुत शहरात एका हायपरमार्केटमध्ये बुधवारी रात्री उशिरा भीषण आग लागल्याने कमीतकमी 61 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. वासित प्रांताच्या गर्व्हनरांनी 61 बळींची पुष्टी दिली आहे. या आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात पाच मजली इमारत आगीच्या ज्वाळांनी वेढली गेल्याचे दिसून येते. तर प्रारंभिक तपास अहवाल 48 तासांच्या आत जारी केला जाणार आहे. मॉल आणि इमारतीच्या मालकाच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आल्याचे गव्हर्नरनी सांगितले आहे. स्थानिक प्रशासन आणि बचावपथकाने रात्रभर मदत अन् बचावकार्य राबविले आहे. आगीचे भीषण रुप पाहता ती पाणी आणि फोमद्वारे विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला, ज्यात अनेक तासांचा कालावधी लागला आहे.
इमारतीत अनेक लोक अडकून पडले होते, त्यांना बाहेर काढण्यासाठी मोठी मेहनत करावी लागली आहे. दुर्घटनेतील जखमींना अल-कुतच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. बचावपथकाने इमारतीत अडकलेल्या 45 हून अधिक लोकांना वाचविले आहे. तर काही लोक बेपत्ता आहेत. हा मॉल मागील आठवड्यातच सुरू झाला होता. या दुर्घटनेनंतर प्रांतीय गव्हर्नर मोहम्म अल-मायह यांनी तीन दिवसांच्या शोकाची घोषणा केली आहे. तर इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी यांनी अंतर्गत विषयक मंत्र्यांना घटनास्थळी पाहणी करण्याचा आणि अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी पावले उचलण्याचा निर्देश दिला.









