सांगली :
कोल्हापूरहून मुंबईला निघालेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसला गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वातानुकूलित डब्यांच्या चाकाजवळ आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. कोल्हापूरचे गांधीनगर रेल्वे स्थानक पार करून रुकडीच्या पुलावर गाडीचे इंजिन असताना काही प्रवाशांच्या जागरूकतेमुळे गाडी जागेवरच थांबवण्यात आली. सुमारे पाऊण तास गाडीतील साधनांनी आगीवर नियंत्रण आणून ती रवाना करण्यात आली.
याबाबत प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून निघालेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसला एम २ या वातानुकूलित डब्याच्या चाकाजवळ आग लागल्याची जाणीव स्लीपर कोचच्या एस 1 आणि एस 2 डब्यातील काही प्रवाशांना गांधीनगर येथेच झाली होती. मात्र तोपर्यंत गाडीने स्थानक सोडले होते. गाडी पुढे गेल्यानंतर मोठा धूर येऊ लागला आणि त्यानंतर पुन्हा आगीच्या ज्वाला दिसू लागल्या. ही घटना काही चाणक्य प्रवाशांनी जाणून गाडीचे आपत्कालीन ब्रेक ओढले. चालक आणि गार्डनी त्यांच्याकडून मिळत असलेल्या माहितीनुसार तातडीने पाहणी सुरू केली तेव्हा आग लागण्याचे त्यांच्याही निदर्शनास आले.
या गाडीत एकूण सात आगीवर नियंत्रण आणणारे छोटे सिलेंडर होते. त्यांच्या सहाय्याने सुमारे पाऊण तास आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू होते. ९ वाजून ५० मिनिटानंतर तिला मिरजेच्या दिशेने रवाना करण्यात आले.
- महिन्यात आगीची तिसरी घटना
याबाबत काही नियमित प्रवाशांनी धक्कादायक माहिती दिली. या मार्गावर गेल्या महिन्या भरात आगीची ही तिसरी घटना असून रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले आहे. यापूर्वी कराड जवळ सस्पेंशन आणि ब्रेक रबरला आग लागली होती. त्यापूर्वी एका डेमो एक्सप्रेस लाही आग लागली होती. महालक्ष्मीतून दक्षिण महाराष्ट्रातील व्हीआयपींसह हजारो लोक प्रवासाला पसंती देतात. त्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. रात्री लोक झोपेत असताना ही दुर्घटना घडली असती तर मोठा अनर्थ झाला असता. या गाडीत जाता येता पुरेसे पाणीही नसते असे या संतप्त प्रवाशांनी सांगितले. दरम्यान मिरज जंक्शन येथे गाडी येताच रेल्वेचे प्रशासकीय आणि वाहतूक अधिकारी गाडीच्या मेंटेंनन्सची माहिती घेणार असल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.
- भयभीत प्रवासी उतरले लोहमार्गावर
अचानक थांबलेली गाडी आणि समोर दिसणाऱ्या धुरामुळे गाडीतील शेकडो प्रवासी भयभीत झाले. गाडीचे इंजिन पुलावर होते मात्र उर्वरित सर्व डबे हे लोहमार्गावरच असल्याने घाबरलेल्या लोकांनी पटापट थांबलेल्या गाडीतून उड्या मारल्या. पाऊण तास सर्व प्रवासी घाबरून लोहमार्गावरच उभे होते. गाडी सुरू होताच त्यांची धावपळ उडाली.








