बॉयलरसह बगॅस यंत्र, रबर आगीच्या भक्ष्यस्थानी : अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात
वार्ताहर/निपाणी
हालसिद्धनाथ साखर कारखान्याच्या बॉयलरनजीक आग लागल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 4 च्या सुमारास घडली. अल्पावधीतच सदर आग पसरत रबर, बगॅस वाहून नेणाऱ्या यंत्रणेला लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कारखान्याचे सुमारे 5 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी निपाणीसह परिसरातील 7 अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. कारखाना कार्यस्थळी कारखान्याचे चेअरमन एम. पी. पाटील, व्हाईस चेअरमन पवन पाटील यांच्यासह संचालकांनी धाव घेताना झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
जिल्हा अग्निशमन दलाचे अधिकारी शशिधर निलगार यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत अधिक माहिती अशी की, हालसिद्धनाथ कारखान्याचा गळीत हंगाम सध्या बंद आहे. असे असले तरी इथेनॉल निर्मिती प्रकल्प सुरू असल्याने वीजनिर्मिती व इथेनॉल प्रकल्पाला बॉयलरद्वारे इंधन पुरवठा केला जात आहे. त्यामुळे बॉयलरचे काम नियमितपणे सुरू आहे, असे असताना शुक्रवारी सायंकाळी 4 च्या सुमारास बॉयलर ठिकाणी आगीची घटना घडली. ही आग जवळच असलेले रबर व बग्यास वाहतूक यंत्रणेलाही लागली. आगीची घटना घडल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी प्रशासनाला तातडीने माहिती पुरवली.
यानंतर अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले. निपाणी, चिकोडी, संकेश्वर, हमीदवाडा, कागल येथील बंबाच्या सहाय्याने अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. सध्या उन्हाचा तडाखा वाढत आहे. अशा या परिस्थितीत आगीची घटना घडल्याने आग आटोक्यात आणताना अग्निशमन दलाला तारेवरची कसरत करावी लागली. सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. पण या कालावधीत बॉयलर बग्यास वाहून नेणारी यंत्रणा, बॉयलर जवळ असणारे रबर आणि बग्यास यांचे मोठे नुकसान झाले. कारखाना कार्यस्थळी घडलेल्या या घटनेमुळे कारखाना प्रशासनाबरोबरच कर्मचाऱ्यांची देखील मोठी धावपळ झाल्याचे दिसून आले.









