प्रतिनिधी /वास्को
ड्रायव्हरहिल वास्को येथील श्री दत्त मंदिरासमोरील दोन घरात आगीची ठिणगी पडल्याने दोन्ही घरे जळाली. दोन्ही घरांचे मोटय़ा प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सोमवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार ड्रायव्हरहिल येथील संजय नाईक व अच्युत नाईक या भावडांच्या तसेच आल्प्रेड आजावेदो या दोन कुटुंबाच्या घरात ही आगीची घटना घडली. या कुटुंबातील सदस्य घराबाहेर गेले होते. या घरात लहान मुले तेवढीच होती. सुरवातीला घरातून धूर निघत होता. धूर निघत असल्याने घरातील लहान मुले घराबाहेर पडली. मात्र, थोडय़ा वेळाने त्या घरात आग भडकल्याचे दिसून आल्याने शेजाऱयांनी धावाधाव सुरू केली. अग्नीशमक दलही त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. बचाव कार्य सुरू केले. मात्र, तोपर्यंत या दोन्ही घराचे छप्परही जळाले. या दोन्ही घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. या घटनेत सुमारे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या दोन्ही घरात गॅस सिलिंडर होते. ते त्वरीत बाहेर काढणे शक्य झाल्याने मोठा अनर्थ ठळला. एमपीटी व वास्को अग्नीशामक दलाने पाण्याच्या बंबांच्या साहाय्याने ही आग विझवीली.









