चिंचोळे भाटले येथील घटना, बाजूच्या घरांनाही आगीची झळ
वार्ताहर /पणजी
चिंचोळे-भाटले येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या परिसरात असलेल्या चप्पल, बुट व प्लास्टिकच्या गोदामाला आग लागून अंदाज 20 लाखांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.
चिंचोळे येथील राज डेकोरेटर्स गोदामात अनेक डेकोरेटसाठी लागणारे कार्पेट, चप्पल, बुट व प्लास्टिकच्या वस्तू साठवून ठेवल्या होत्या. मंगळवारी मध्यरात्री अचानक या गोदामाला आग लागल्याची माहिती शेजाऱ्यांना मिळताच त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आग भडकत असल्याचे पाहून त्यांनी अग्निशामक दलास कळविले. त्यानंतर आग विझविण्यासाठी चार बंब दाखल झाले. अखेर जवानांनी अथक परिश्रम घेत ही आग विझविली.
गोदामाचे मालक जीया शेख यांना लाखो रुपयांचा फटका बसला असला तरी या आगीची झळ मुवीन, इर्फान, शकील यांच्या घरांना बसल्यामुळे त्यांचेही नुकसान झाले आहे. ही आग कशामुळे लागली याची माहिती मिळाली नाही. याची चौकशी अग्निशामक दलाचे अधिकारी राहुल देसाई करीत आहेत.









