सातारा :
जकातवाडी (ता. सातारा) येथे सिलेंडर लिक होऊन आग लागली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ, महिला सरपंच यांनी तात्काळ धाव घेत आग विझवण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती मिळताच अग्नीशामक दल घटनास्थळी दाखल झाले.
जकातवाडी गावातील वस्ताजनगरमध्ये राहणारे रमेश गोळे यांच्या घरी एचपी कंपनीचा सिलेंडर आला. त्यांनी तो सिलेंडर घेऊन रेग्युलेटरला जोडला. परंतु वायसरला होल असल्याचे गॅस लिक होऊ लागला. ही बाब गोळे यांच्या लक्षात आली नाही. त्यांनी शेगडीचे बटन सुरू करून लायटर लावला. तोच सिलेंडरला आग लागली. हे पाहून गोंधळ निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व महिला सरपंच अश्विनी दळवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अग्नीशामक दलाला घटनेची माहिती दिली. तोपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. काही वेळात ही आग विझवण्यात यश आले. यामुळे मोठा अनर्थ टळला.
- सिलेंडरची घ्या तपासणी करून
तुमच्या घरी कोणत्याही कंपनीचा सिलेंडर येताच पहिल्यांदा त्याचा वायसर नीट आहे का याची तपासणी त्या कर्मचाऱ्याकडून करून घ्या. जर तुम्हाला काहीही शंका वाटत असेल तर तात्काळ संबंधित गॅस ऍजन्सीला संपर्क साधा. अशा घटना कोणासोबतही घडु शकतात. यामुळे आपणच काळजी घेतली पाहिजे असे आवाहन जकातवाडी गावच्या महिला सरपंच अश्विनी दळवी यांनी केले आहे.








