इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह गृहोपयोगी साहित्य जळून खाक
बेळगाव : शॉर्टसर्किटने घराला आग लागून संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. भांदूर गल्ली, अनगोळ येथे लागलेल्या आगीमध्ये घरातील किमती सामान, कागदपत्रे, टीव्हीसह इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य जळाले. यामुळे अंदाजे एक लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.भांदूर गल्ली, अनगोळ येथे राहणाऱ्या मीरा गोपाळ कंग्राळकर यांच्या घरामध्ये मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. घरामध्ये कपडे, कागदपत्रे किमती वस्तू यासह टीव्ही व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे होती. हे सर्व साहित्य जळून खाक झाले. आगीची भीषणता इतकी होती की घराच्या खिडक्याही फुटून गेल्या. त्याची झळ छतालाही बसली आहे. स्थानिकांनी आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. परंतु कंग्राळकर कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाने याची दखल घेऊन नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.









