खेड :
रायगड जिल्ह्यातील अलिबाग समुद्रात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एका मासेमारीला नौकेला भीषण आग लागली. राकेश मारुती गण (रा. साखर–अलिबाग) यांच्या मालकीची ही नौका असून यात सुमारे 2 कोटी रुपयांची हानी झाली आहे. नौकवरील 18 खलाशांना वाचवण्यात नौदल, भारतीय तटरक्षक दल, सागरी पोलीस व स्थानिक मच्छीमारांना यश आले. किनाऱ्यापासून 6 ते 7 सागरी मैल अंतरावर ही घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दोनच दिवसापूर्वी रायगड जिल्ह्यातील करंजा येथील समुद्रकिनारी डागडुजीसाठी उभ्या करण्यात आलेल्या दोन मासेमारी नौकांना आग लागल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा भर समुद्रात मासेमारी नौकेला लागलेल्या आगीने खळबळ एकच उडाली. पहाटेच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक मच्छीमार, नौदल, भारतीय तटरक्षक दल व सागरी पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहचली. या बोटीवर 18 खलाशी कार्यरत होते. या सर्व खलाशांना नौदल व तटरक्षक दलाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. आगीत नौका 80 टक्के जळून खाक झाली. बोटीवरील जाळी भस्मसात झाली. आग आटोक्यात आणल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने जळालेली नौका किनाऱ्यावर आणण्यात आली.








