जुनी कागदपत्रे जळून खाक : अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण
बेळगाव : रिसालदार गल्लीतील तहसीलदार कार्यालयाच्या पाठीमागील जुन्या इमारतीला आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. आगीत तहसीलदार कार्यालयातील जुनी कागदपत्रे जळून खाक झाली असून अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. मात्र, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. रिसालदार गल्लीतील महानगरपालिकेच्या मालकीच्या इमारतीत तहसीलदार कार्यालय सुरू करण्यात आले आहे. तहसीलदार कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या जुन्या इमारतीत काही कागदपत्रे ठेवण्यात आली होती. पण, सदर इमारत धोकादायक बनल्याने त्याचा वापर करणे टाळण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी जुन्या इमारतीच्या खालच्या मजल्यातील खोलीत ठेवण्यात आलेल्या कागदपत्रांनी अचानक पेट घेतला. आग लागल्यानंतर धुराचे लोळ परिसरात पसरण्यास सुरुवात झाली. ही बाब तेथील लोकांच्या निदर्शनास आली. त्यामुळे तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांसह विविध कामानिमित्त आलेल्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. ही माहिती काहींनी अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे जवान काहीवेळातच पाण्याच्या बंबासह दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. यामध्ये मोठे नुकसान झाले नसले तरी जुनी कागदपत्रे जळून खाक झाली. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे मात्र समजू शकले नाही. घटनेची माहिती समजताच खडेबाजार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रिसालदार गल्लीकडे येणाऱ्या रस्त्याचे दोन्ही बाजूचे प्रवेशद्वार बंद करून वाहने पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली.
‘ते’ प्रवेशद्वार बंद करण्याची मागणी
आगीची घटना घडताच द्वितीय दर्जा तहसीलदार सुभाष असोदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणी आलेल्या खडेबाजार पोलिसांनी पाठीमागील दरवाजाला कुलूप घालून बंद करण्यात यावा, अशी विनंती तहसीलदारांना केली. पाठीमागील दरवाजातून प्रवेश करणाऱ्या नशेबाज तरुणांना आवर घालण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
नशेबाज तरुणांचा वावर 
तहसीलदार कार्यालयाच्या मागील बाजूने एक रस्ता आहे. तेथून काही नशेबाज तरुण आत प्रवेश करत असतात. जुन्या इमारतीमध्ये मद्यप्राशन करण्यासह धूम्रपान करणे व इतर नशाबाजी केली जाते. त्यामुळे गुरुवारी दुपारी नशेबाज तरुणांनी सिगारेट ओढून टाकल्याने ही आग लागली असावी, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. जुन्या इमारतीच्या आवारात मद्याच्या बाटल्याही पडल्याचे यावेळी दिसून आले.









