सहा तासात आगीवर नियंत्रण : सुमारे 4 हजार लोकांना वाचविण्यात यश
वृत्तसंस्था/ दुबई
दुबईतील मरीना परिसरातील 67 मजली उंच इमारतीत शुक्रवारी रात्री 9:30 वाजता भीषण आग लागली. गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार, आग इतकी भीषण होती की ज्वाला खालपासून वरपर्यंत पसरल्या. तसेच सर्वत्र धूर पसरला होता. घटनेची माहिती मिळताच दुबई सिव्हिल डिफेन्सच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. रात्रभर चाललेल्या या बचाव मोहीमेत पथकांनी इमारतीत राहणाऱ्या 3,800 हून अधिक लोकांना बाहेर काढत सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली.
आग लागलेल्या 67 मजली इमारतीचे नाव ‘मरीना पिनॅकल’ असे आहे. या अग्नितांडवात कोणीही मृत किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. आपत्कालीन सेवांनी केलेल्या तात्काळ कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सध्या आग आटोक्यात आली असली तरी अनेक लोकांना अजूनही आपल्या घराची स्थिती काय आहे हे माहित नाही. काही लोक हॉटेलमध्ये राहत आहेत, तर काहींना धुरामुळे झालेल्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
‘मरीना पिनॅकल’ला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर जवळच्या इमारतीतील लोकांनाही बचावाच्या कारणास्तव हलविण्यात आले होते. आजबाजुच्या जवळपास चार-पाच इमारती पूर्णपणे रहिवासीमुक्त करण्यात आल्या होत्या.









