संकुलातील 210 दुकाने जळून खाक
वृत्तसंस्था/ प्रयागराज
प्रयागराजमधील नेहरू कॉम्प्लेक्समध्ये शनिवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीमध्ये संकुलातील 210 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. त्यापैकी 30 दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. कर्मचाऱ्यांनी पाच तासांनंतर आग आटोक्मयात आणली असून संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. कॉम्प्लेक्समध्ये कपडे आणि प्लास्टिकच्या वस्तू विकण्याची दुकाने होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे. ज्याठिकाणी आग लागली ती जागा शहरातील सर्वात दाट आहे. या परिसरात 10 हजारांहून अधिक दुकाने आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपमहानिरीक्षक (अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, उत्तर प्रदेश) जुगुल किशोर हेही घटनास्थळी पोहोचले होते. या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाले असले तरी सुदैवाने जीवितहानी टळली आहे.









