21 दुकाने जळून खाक : लाखो रुपयांची हानी : आग आटोक्यात आणण्यात सावर्डेतील दोन युवकांचीही धाडसी कामगिरी
कुडचडे : कुडचडे जी सुडा मार्केट व कुडचडे काकोडा नगरपालिका स्ट्रीट व्हेंडर व्यापारी संकुलात रविवारी मध्यरात्री नंतर अंदाजे 2.45 वा. आग लागल्याने एकूण 21 दुकाने जळून खाक झाली. या आगीत लाखो ऊपयांचे नुकसान झाल्याची माहिती दुकानदारांनी दिली आहे. दिवाळी सणानिमित्त व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आणलेला माल या आगीत जळून खाक झाला. उपलब्ध माहिती प्रमाणे, रविवारी मध्यरात्री नंतर अंदाजे 2.45 मिनिटांनी झाली. त्यावेळी कुडचडे कदंब बसस्थानकावर नरकासुर प्रतिमा वध स्पर्धा सुरू होती. त्यावेळी बाजूला असलेल्या जी सुडाच्या मार्केटमधून आगीचे लोळ बाहेर पडू लागल्यावर लोकांनी आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे या घटनेची माहिती स्पर्धा सुरू असलेल्या ठिकाणी तैनात असलेल्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी पाण्याचा बंब घेऊन घटनास्थळी धाव घेतली व आग विझवण्यास सुरुवात केली. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने त्यांना दुसरा बंब मागवावा लागला.
सावर्डेतील दोन युवकांचे धाडस
अग्निशामक दलाचे बरेच कर्मचारी नरकासुर वध स्पर्धा बघण्यासाठी आले होते. त्यांनीही या ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य केले. तसेच सावर्डे येथील दोन युवकांनी सदर ठिकाणी जळत असलेले प्लास्टिक बाजूला करून इतर ठिकाणी फैलावणारी आग रोखली. सदर युवकांनी आपला जीव धोक्यात घालून आग फैलावण्यापासून रोखल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. आग आटोक्यात आणण्यात एक तासाहून जास्त वेळ लागल्याची माहिती कुडचडे अग्निशामक दलाच्या कार्यालयातून देण्यात आली.
सरकारतर्फे मदत मिळवून देऊ : नगराध्यक्ष
दिवाळीच्या पूर्वरात्री जी सुडा मार्केट व स्ट्रीट व्हेंडर शेडमध्ये आग लागण्याची घटना घडली. त्यावर नगराध्यक्ष प्रसन्ना भेंडे यांनी दु:ख व्यक्त केले. ज्या व्यापारांना नुकसान झाले, त्यांना नगराध्यक्ष या नात्याने सरकारकडून मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. ऐन दिवाळी सणाच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे त्यांना दुसऱ्या ठिकाणी व्यापार विक्रीसाठी जागेची तरतूद लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करणार, अशी माहिती त्यांनी दिली.
शेडचे नूतनीकरण करावे : होडारकर
नगरसेवक बाळकृष्ण होडारकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, जी सुडा मार्केटमध्ये जी घटना घडली आहे. त्याबद्दल बोलणे कठीण होत आहे. या आगीत एकूण 21 व्यापाऱ्यांची दुकाने जळून खाक झाली आहे. दिवाळीच्या सणासाठी व्यापाऱ्यांनी माल आणला होता तो जळून खाक झाला आहे त्याबद्दल मी खंत व्यक्त करतो. या शेडसंबंधित पालिका बैठकीत चर्चा केली होती. लोखंडी पत्र्यामुळे व्यापाऱ्यांना त्रास होत असल्याकडे लक्ष वेधले होते. पण, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ही आग कदाचित अन्य कारणास्तव लागू शकते. पण, त्यात एक कारण म्हणजे लोखंडी पत्र्यांमुळे आग लागण्याची शक्यता आहे. आता या घटनेनंतर तरी प्रशासनाने या शेडचे ताबडतोब नूतनीकरण करून घ्यावे व व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.
सरकारचे सुरक्षेकडे दुर्लक्ष : अमित पाटकर
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ते म्हणाले की, ही घटना दु:खदायक आहे. यात सामान्य लोकांचे नुकसान झाले आहे. ज्यावेळेस येथे हे बाजार संकुल बांधण्यात आले होते, तेव्हा सुरक्षतेच्या बाबतीत कोणतीच तरतूद करण्यात आलेली नाही हे स्पष्टपणे दिसून येते. आज सुरक्षितेसाठी कितीतरी सोयी उपलब्ध आहे. पण, त्याची या ठिकाणी कमतरता दिसून येते. त्याचा फटका सामान्य व्यापाऱ्यांना बसला आहे. आज सरकार सामान्य लोकांसाठी सर्व सोयी उपलब्ध करून देण्याची भाषा बोलत आहे. मात्र, सरकार सामान्य लोकांना सुरक्षा देण्यास अपयशी ठरलेले आहे हे कुडचडेतील घटनेतून स्पष्ट झाले आहे. यावेळी त्या दोन युवकांचे आभार व्यक्त करतो, ज्यांनी मोठ्या धाडसाने मार्केटमध्ये फैलावणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच मी मागणी करतो की, कुडचडेतील मार्केटचे सुरक्षेबाबतीत एक सर्वेक्षण व्हावे. यासंदर्भात आपण अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांजवळ बोलणार अशी माहिती अमित पाटकर यांनी दिली.
व्यापाऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देणार : रोहन गावस देसाई
कुडचडेत नरकासुर प्रतिमा वध स्पर्धा सुऊ असताना मध्यरात्री जी आग या मार्केटमध्ये लागली ती भयावह होती. त्यात दिवाळी सणाच्या विक्रीसाठी व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आणलेला माल पूर्णत: जळून खाक झाला. आपण आपल्या बाजूने जे सहकार्य होईल ते करेन, तसेच पालिकेच्या नगरसेवकांजवळ आपण चर्चा केलेली आहे. त्यानुसार लवकरच या व्यापाऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न करणार, अशी माहिती समाजसेवक रोहन गावस देसाई यांनी यावेळी दिली. रोहन गावस देसाई यांनी मार्केटला आग लागलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. हे मार्केट 2003 साली बांधण्यात आले. त्यानंतर आजपर्यंत या मार्केट मधील प्रत्येक व्यापाऱ्यांने पालिकेचे कर वेळो वेळी भरलेला आहे. त्या अनुषंगाने अजून पर्यत नगरपालिकेने कधीच या मार्केटच्या हितासाठी कोणत्याच हालचाली केलेल्या नाही. ही दु:खाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ व्यापारी पांडुरंग नाईक यांनी व्यक्त केली.
या मार्केटसंदर्भात आपण कित्येक वेळा नगरसेवक व इतर प्रतिनिधीशी बोललो की, हे मार्केट बांधण्यात आलेले आहे ते जुन्या काळी लोक कोंबड्या पाळण्यासाठी घर करत होते. त्याप्रमाणे केलेले आहे. आपण निवेदन दिले होते व त्यात मार्केट मध्ये केलेले गाळे पाडून त्या ठिकाणी सुटसुटीत गाळे बांधून द्यावे. त्यामुळे पालिकेला चांगले उत्पन्न मिळेल व पालिका कर्मचाऱ्यांना काम करण्यास सोयीस्कर होईल. पण, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मार्केटातील बऱ्याच व्यापाऱ्यांचा माल जळून खाक झाला आहे तसेच अनेकांचा माल आगीच्या लोळामुळे खराब झालेला आहे. यापूर्वी अशीच आगीची घटना घडली होती. त्योळी माजी आमदार शाम सातार्डेकर यांनी व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई दिली होती. त्याच प्रमाणे आता नुकसानभरपाई देण्यात यावी असे श्री. नाईक म्हणाले.
या आगीत सुषमा रामचंद्र नाईक, दीपक नाईक, नवरातीन फर्नांडिस, माली बोरकर, प्रेमा गावंकर, येसू नाईक, रंगनाथ नाईक, पवन गुंडन्हाळाली तसेच आजूबाजूच्या अन्य व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाच्या कर्मचारीवर्गाने आग विझविण्याच्या मोहिमेत सहभागी होऊन लाखो ऊपयांची संपत्ती वाचविण्यात यश प्राप्त केले. या मोहिमेत लिडींग फायर ऑफिसर धर्मेंद्र जी. नाईक, सहकारी मनोज नाईक, मनोज गावकर, ऊपेश गवळी, मॅन्युएल डी कोस्टा, सिद्धार्थ मोरजकर, सत्यवान गावकर, साईराज नाईक, शुभम नाईक, तेजस खरात, अनिल तातो. ऑफ ड्युटी कर्मचारी : सर्वेश नाईक, निखिल नाईक, वैभव अडेल, शुभम गावकर, हर्ष नाईक (मडगाव अग्निशामक दल), रतिल बोरकर (मडगाव अग्निशमन दल) यांचा सहभाग होता.









