रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये आढळले होते बेशुद्ध : 20 जखमी
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूच्या डिंडीगुलमध्ये खासगी रुग्णालयात आग लागल्याने 6 जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व जण रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये बेशुद्ध आढळून आले होते. मृतांमध्ये एका अल्पवयीनाचा देखील समावेश आहे. गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
त्रिची रोडवरील ऑर्थोपेडिक केअर सिटी हॉस्पिटलच्या रिसेप्शन एरियात आग लागली होती. जी पूर्ण इमारतीत फैलावली होती. दुर्घटनेदरम्यान रुग्णालयात 30 हून अधिक रुग्ण दाखल होते. आग लागल्याची माहिती कळताच बचावमोहीम हाती घेण्यात आली होती. रुग्णांना 10 रुग्णवाहिकांच्या मदतीने नजीकच्या रुग्णालयांमध्sय हलविण्यात आले होते असे पोलिसांनी सांगितले आहे
लिफ्टमध्ये आढळून आलेल्या सर्व लोकांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, जेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. तर अन्य रुग्णांवर सध्या उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.पोलीस आणि अग्निशमन दलानुसार शॉर्ट सर्किटनंतर आग लागली असावी. याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांनी त्वरित पावले उचलली होती. अनेक लोकांना वाचविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.एन. पूंगोडी यांनी दिली आहे.









