140 छोट्या टाक्या खाक : अंदाजे 5 कोटींचे नुकसान,आगीच्या तीव्रतेने परिसरातील लोक हादरले
कुंकळ्ळी : मुरमे, नाकेरी-बेतूल येथील ह्युजेस प्रिसिजन कंपनीच्या गनपावडर ठेवण्यात येणाऱ्या गोदामाला आग लागण्याची घटना 20 मार्च रोजी रात्री 10.55 च्या सुमारास घडली. या आगीची तीव्रता इतकी होती की, फातर्पा, नुवे-खोल, आगोंद या भागांतून ती दिसून आली व नजीकच्या परिसराबरोबर वरील भागांतील लोकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र या घटनेचे नेमके कारण कळू शकलेले नाही. कुंकळ्ळी पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत गनपावडरच्या 140 छोट्या टाक्या जळून गेलेल्या असून एकंदर हानी प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 5 कोटींच्या घरात आहे. ह्युजेस प्रिसिजनच्या मॅगझिन क्रमांक 1 मध्ये ही आग लागली. सध्या वाढलेल्या उकाड्यातून हा भडका उडाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
या घटनेचा पंचनामा कुंकळ्ळी पोलिसस्थानकाचे उपनिरीक्षक साहिल पागी यांनी केला. या ठिकाणापासून जवळच लोकवस्ती असून तेथील लोकांना रात्री अग्निवर्षाव झाल्याप्रमाणे परिस्थिती जाणवली तसेच काही घरांना तडेही गेल्याचा दावा करण्यात येत आहे. नुवे-खोल येथील घरांचीही हानी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र त्याची पुष्टी होऊ शकली नाही. नुवे, खोल येथील रहिवाशांकडून सव्वाअकराच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती देणारा फोन कॉल आला. त्यानंतर कुंकळ्ळी पोलिस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि वरिष्ठांनाही घटनेबद्दल माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाचे विभागीय अधिकारी फ्रान्सिस मेंडीस देखील घटनास्थळी उपस्थित होते. अग्निशामक दलाने जलदगतीने हालचाली करून अग्निशमन कार्य हाती घेतले व रात्री सव्वाबारापर्यंत आग आटोक्यात आणून घटनास्थळ सुरक्षित करण्यात आले.
स्टोअर रूम, कुंपणाचे नुकसान
सुदैवाने कोणतीही मानवी जीवितहानी झाली नाही. आगीमुळे स्टोअर रूम आणि कुंपणाचे नुकसान झाले. छप्पर व दरवाजा फोडून आगीचा लोळ बाहेर सरल्याचे दिसून आले. या घटनेनंतर कुंकळ्ळी पोलिस निरीक्षकांनी लगेच परिसराला वेढा घालायला लावला आणि कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी कोणीही व्यक्ती गोदामाजवळ पोहोचणार नाही याची काळजी घेतली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी रात्री जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस, दक्षिण गोवा अधीक्षक, उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. याव्यतिरिक्त पोलिसांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना तत्काळ घटनास्थळी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. कारण साठवलेल्या स्फोटकांचे प्रमाण आणि प्रकार कुणाला माहीत नव्हते. सदर घटनेच्या चौकशीसाठी बीडीडीएस टीम आणि एफएसएल टीमची उपस्थिती देखील सुनिश्चित करण्यात आली. कुंकळ्ळी पोलिसांकडून पुढील तपास चालू असून सदर ठिकाणी चार पोलिस पहारा देत आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
आमदारांनी घेतले फैलावर
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता तसेच नाकेरी-बेतूल सरपंच प्रीतम देऊलकर व स्थानिक पंच दमास्को रूझारियो यांनीही गुरुवारी रात्री भेट देऊन या प्रकारावर संताप व्यक्त केला व उपस्थित कंपनीच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. शुक्रवारी सकाळी अग्निशामक दलाचे उपसंचालक राजेंद्र हळदणकर तसेच सौरभ शेटकर यांनी भेट देऊन आढावा घेतला. तसेच फॉरेन्सिक पथकानेही पाहणी केली.
पंचायतीने नाकारली परवानगी
या प्रतिनिधीने शुक्रवारी सकाळी या ठिकाणी भेट दिली असता सरपंच देऊलकर व स्थानिक पंच रूझारियो यांनी सांगितले की, या गोदामासाठी 2019 मध्ये एनओसी मागण्यात आली होती. तसेच गेल्या वर्षी पोलिसांमार्फत दोन वेळा परवानगी मागण्यात आली होती. मात्र या गोदामापासून 800 मीटर अंतरावर लोकवस्ती असल्याने परवानगी देणे टाळण्यात आले होते, सध्या आगग्रस्त गोदामाजवळच आणखी एक अशाच प्रकारचे गोदाम उभारण्यात आले असून पुढील कृती काय होते ते पाहून आणि लोकांना विश्वासात घेऊन पुढील पाऊल उचलण्यात येईल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र हे गोदाम ‘पेसो’ म्हणजे पेट्रोलियम व स्फोटके सुरक्षा संघटनेच्या खाली येते व त्याला पंचायतीची परवानगी अनिवार्य नाही, असाही दावा करण्यात येत आहे.









