धान्य-गृहपयोगी वस्तू जळून खाक
वार्ताहर /कणकुंबी
एका अपंग पती-पत्नीच्या घराला अचानकपणे लागलेल्या आगीत घरातील रेशन, कडधान्य, कपडे व इतर गृहपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना शुक्रवार दि. 25 रोजी दुपारी माण गावात घडली. पारवाड ग्राम पंचायत क्षेत्रातील माण गावातील संतोष गोपाळ गावडे व दिव्या दोघेही पती-पत्नी अपंग असून संतोष कामानिमित्त बेळगावला असतो तर दिव्या कणकुंबी येथे शुक्रवारच्या बाजाराला गेली होती. दुपारी दिव्या बाजार घेऊन जेव्हा घरी परतली त्या वेळेला घरातून धूर येत असलेला तिने पाहिला. तेव्हा घरात जाऊन पाहिले असता आगीमध्ये रेशन, कडधान्य व इतर सर्व साहित्य जळत असल्याचे दिसले. ते पाहिल्यानंतर तिने आरडाओरड केल्यानंतर आग आटोक्मयात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत सर्वच जळून खाक झाले. याचवेळी पारवाड ग्राम पंचायतीचे अध्यक्ष भिकाजी गावडे व सदस्य बाबाजी पाटील हे माण गावातील नागरिकांसाठी ओला आणि सुका कचऱ्याच्या बादल्या वाटप करण्यासाठी गेले होते. त्यांना ही बातमी समजताच त्यांनीही मदतीसाठी धाव घेतली व आग आटोक्मयात आणण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी अध्यक्षानी त्यांना साहाय्यधन म्हणून ग्राम पंचायतीतर्फे पाच हजार ऊपयांचा धनादेश दिला. अपंग जोडप्यांना दोन मुले आहेत. घरातील सर्व साहित्य जळून गेल्याने या कुटुंबाला मदतीची गरज आहे. त्यामुळे सहकार्य करावे, असे आवाहन गावडे यांनी केले आहे.









