ऑनलाईन टीम / तरुण भारत :
घाटकोपरमधील पारेख रुग्णालयाच्या इमारतीला आज दुपारी भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र, दुर्देवाने यात एकाचा मृत्यू झाला. पोरशी देढिया असे आगीत होरपळून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
आज दुपारी अचानक पारेख रुग्णालयाच्या इमारतीला आग लागली. रुग्णालयाच्या ग्राऊंड फ्लोअरवर एक हॉटेल आहे. या हॉटेलच्या मागच्या बाजूला ही आग लागली. क्षणार्धात ही आग पहिल्या आणि दुसऱया माळय़ापर्यंत पोहोचली. आगीची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दलाच्या आठ गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेत आगीवर नियंत्रण मिळवले. त्याचदरम्यान, रुग्णालयात अडकलेल्या रुग्णांना इतर जवानांनी सुखरुप बाहेर काढले. दरम्यान, आगीत होरपळून एकाचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे.
अधिक वाचा : …त्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
या रुग्णालयात गंभीर आजारावर उपचार घेणारे काही रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. त्यांना धुराच्या लोटांमुळे श्वास घेण्यास अडचण आल्याने बाजूच्या राजेवाडी रुग्णालयात हालविण्यात आले आहे.








