अंदाजे 25 लाखाचे साहित्य जळून खाक : शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज
खानापूर/ प्रतिनिधी
येथील मराठा मंडळ महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या कॅनरा बँकेत शुक्रवारी रात्री आग लागली. शनिवारी पहाटे फिरायला गेलेल्या नागरिकांच्या निदर्शनास ही आगीची घटना आल्यावर खानापूर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अग्निशामक दलाला शनिवारी पहाटे प्राचारण करून आग आटोक्यात आणण्यात आहे. या आगीत अंदाजे 25 लाखाचे साहित्य जळून खाक झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेची नोंद खानापूर पोलिसात करण्यात आली आहे.आग शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्रथम दर्शनी सांगण्यात येत आहे.
याबाबत माहिती अशी की, खानापूर-हल्ल्याळ मार्गावर मराठा मंडळ महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या दुमजली इमारतीत पहिल्या मजल्यावर कॅनरा बँकेची शाखा आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर बँकेत आग लागल्याची घटना घडली. पहाटे पाच वाजता फिरायला जाणाऱ्या नागरिकांना बँकेतून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे दिसून आले. त्या नागरिकांनी याबाबतची माहिती खानापूर पोलिसांना दिली. खानापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एम. गिरीश, हवालदार जयराम हम्मन्नावर यांनी घटनास्थळी दाखल होऊन तातडीने अग्निशामक दलाला प्राचारण केले. आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. त्यानंतर बँक कर्मचाऱ्यांना बोलावून बँक उघडून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. बॅँकेत मोठ्या प्रमाणात धूर कोंडला असल्याने अग्निशामक दलाच्या जवानांना विझवण्यासाठी आत जाताना त्रास होत होता. यासाठी ऑक्सिजन सिलेंडर आणि मास्क लावून अग्निशामक दलाच्या जवानांनी आत प्रवेश केला आणि आग आटोक्यात आणली आणली. मात्र बँकेची संपूर्ण कागदपत्रे आणि फर्निचर, कॉम्प्युटर, प्रिंटर, बायोमेट्रिक मशीन, पंखे यासह इतर साहित्य जळून खाक झाल्याने अंदाजे 25लाख ऊपयांचे नुकसान झाल्याचे समजते.
अग्निशामक दलाचे प्रमुख राठोड यांनी आपल्या जवानासह ऑक्सिजन सिलेंडर घेऊन आत प्रवेश करून आग संपूर्णपणे विझवली. मात्र यात बँकेची मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, साहित्य जळून खाक झाले आहे. गेल्या महिन्यापूर्वीच सिंडिकेट बँक आणि कॅनरा बँकचे विलीनीकरण झाले आहे. त्यामुळे घोडे गल्ली येथील सिंडिकेट बँकेची शाखा कॅनरा बँकेत एकत्रीकरण करण्यात आली आहे. सिंडिकेट बँकेची कागदपत्रे या ठिकाणी हलविण्यात आली आहेत. त्यामुळे दोन्ही बँकेचे मिळून जवळपास एक लाख ग्राहक असल्याने मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जळून खाक झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत बँक व्यवस्थापकांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती देण्यास नाकार दिला असून पत्रकारांना बँकेत येण्यास मज्जाव केला.
गेल्या चार दिवसांपासून कॅनरा बँकेकडून ग्राहकांना कोणती सेवा देण्यात येत नव्हती. सर्वर डाऊन असल्याचे सांगून ग्राहकांना परत पाठवण्यात येत असल्याचे यावेळी तिथे जमलेल्या ग्राहकांनी सांगितले. ही बँक पहिल्या मजल्यावर असून एकदम छोट्याशा जागेत दोन्ही बँकेचे एकत्रिकरण केल्याने ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आग किंवा चोरीची घटना होऊ नये म्हणून बँकेत आर्लाम आणि सिक्युरिटी असते. मात्र या बँकेत तशी व्यवस्था नव्हती याबाबत नागरिकांतून उलटसुलट चर्चा सुऊ आहे.









