अग्निशमन दलाच्या 27 गाड्या घटनास्थळी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील सदर बाजार परिसरात शनिवारी दुपारी आगीची मोठी दुर्घटना घडली. येथील एका दुकानाच्या पहिल्या मजल्यावर भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 27 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. त्यानंतर आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. ही घटना दिल्लीतील प्रमुख घाऊक बाजारपेठ असलेल्या सदर बाजारसारख्या वर्दळीच्या आणि गर्दीच्या परिसरात घडली. आगीमुळे दुकानात ठेवलेल्या वस्तू बेचिराख झाल्या. तथापि, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
आगीच्या ज्वाळांनी परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण केले. आग इतकी भीषण होती की संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला. दुकानाच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्यानंतर धूर आणि ज्वाळा वेगाने पसरू लागल्या. त्यानंतर अग्निशमन विभागाला दुपारी 3:50 वाजता आगीबद्दल फोन करण्यात आला. सायंकाळपर्यंत अग्निशमन दल आग विझवण्यासोबतच बचावकार्यात गुंतले होते.









