हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने मंत्री पोनमुडी यांना दणका,गुन्हा दाखल करा, अन्यथा अवमान खटल्यासाठी तयार राहा : उच्च न्यायालयाने तामिळनाडू पोलिसांना निर्देश
वृत्तसंस्था/चेन्नई
तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या सरकारमधील मंत्री आणि द्रमुक नेते के. पोनमुडी वादात सापडले आहेत. पोनमुडी यांना हिंदू धर्मावरील वक्तव्य महागात पडण्याची चिन्हे दिसत आहेत. मद्रास उच्च न्यायालयाने पोनमुडी यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश गुरुवारी दिले. पोलिसांनी मंत्री पोनमुडी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करावा अन्यथा अवमान खटल्यासाठी तयार राहावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. पोनमुडी यांनी शैव आणि वैष्णव धर्माच्या प्रतीकांवर भाष्य केले होते. यामुळे संतप्त झालेल्या विश्व हिंदू परिषदेने स्टॅलिन मंत्रिमंडळातून मंत्र्याला तात्काळ काढून टाकण्याची मागणी केली. तसेच राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला होता. तसेच पोनमुडी यांच्या वक्तव्यावर द्रमुक खासदार कनिमोझी यांच्यासह अनेकांनी टीका केली. पोनमुडी यांनी श्रद्धेशी संबंधित या प्रकरणात शैव आणि वैष्णव धर्माबद्दल भाष्य केल्यामुळे वाद निर्माण झाला. त्यानंतर सत्ताधारी द्रमुकने त्यांना पक्षाच्या प्रमुख उपसरचिटणीस पदावरून हटवले होते. तथापि, स्टॅलिन यांनी या कारवाईचे कोणतेही कारण दिले नव्हते. मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर लगेचच हे पाऊल उचलण्यात आले होते.









