प्रतिनिधी/ बेळगाव
केदनूर (ता. बेळगाव) येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरावर लावण्यात आलेल्या ध्वनीक्षेपकाची मोडतोड केल्याप्रकरणी तिघा जणांवर काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यासंबंधी संबंधितांवर कारवाई करण्यासाठी गावकऱयांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदनही दिले होते.
अश्विनी मल्लाप्पा चिंदी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भा.दं.वि. 341, 323, 427, 504, 506 सहकलम 34 अन्वये गोपाल आण्णाप्पा संभाजी, सिद्धाप्पा शट्टू होसपेट, संदीप परशराम काकतकर या तिघा जणांवर एफआयआर दाखल केला आहे.
श्रावणमासानिमित्त केदनूर येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरावर श्री ज्ञानेश्वर सांप्रदायिक भजन मंडळाच्यावतीने ध्वनीक्षेपक बसविण्यात आले होते. याला आक्षेप घेत रामचंद्र चन्नू बिर्जे (वय 62) यांना मारहाण करून ध्वनीक्षेपकाची तोडफोड करण्यात आली होती. यापुढे पुन्हा मंदिरावर ध्वनीक्षेपक लावल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती.









