कारला पाईप घासल्याने केली होती मारहाण
प्रतिनिधी/ बेळगाव
ओढ्यातील खेकडे पकडून घरी जाताना हातातील पाईप कारला घासून गेल्याने ओंकारनगर-मच्छे येथील एका युवकाला कारमधील तिघा जणांनी बेल्टने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे झालेल्या मन:स्तापातून त्या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वाघवडेतील तिघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे.
सुनील महादेव देसूरकर (वय 42) मूळचा रा. संतिबस्तवाड, सध्या रा. ओंकारनगर-मच्छे असे त्याचे नाव आहे. गुरुवार दि. 23 जानेवारी रोजी रात्री उशिरा त्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. वेळीच हा प्रकार उघडकीस आल्यामुळे दोरी कापून मध्यरात्री त्याला खासगी इस्पितळात हलविण्यात आले. त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.
गुरुवार दि. 16 जानेवारी रोजी सुनील आपल्या मित्रांसमवेत वाघवडे रोडवरील ओढ्यावर खेकडे पकडण्यासाठी गेला होता. रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास घरी परतताना वाघवडेकडे जाणाऱ्या कारला सुनीलच्या हातातील पाईप घासून गेला. त्यामुळे कारमधील तिघा जणांनी सुनीलला अर्वाच्च शिवीगाळ करीत बेल्टने मारहाण केली होती.
सुनीलला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेनंतर त्याला मन:स्ताप झाला होता. याच मन:स्तापातून गुरुवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास पंख्याला प्लास्टिकच्या दोरीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. खासगी इस्पितळाला हलविताना त्याचा मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी वाघवडे येथील तुषार मारुती आंबोळकर, निलेश मनोहर गोरल, मारुती यशवंत आंबोळकर या तिघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तुषार व निलेश या दोघा जणांना अटक केली आहे. बेळगाव ग्रामीचे पोलीस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी, पोलीस उपनिरीक्षक आदित्य राजन आदी अधिकारी याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.









