शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न लावला उधळून
बेळगाव : पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरावर दगडफेक केल्याच्या आरोपावरून मार्केट पोलिसांनी उज्ज्वलनगर येथील एका तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला असून पांगुळ गल्ली, टेंगिनकेरा गल्ली परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. यासीर युसुफ नासरदी (वय 19) रा. उज्ज्वलनगर असे त्याचे नाव आहे. मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर, उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या तरुणाला अटक केली आहे. दगडफेकीनंतर संतप्त जमावाने यासीरला पकडून चोप दिला होता. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.
पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनीही या घटनेसंबंधी माहिती दिली असून दगडफेकीच्या घटनेनंतर लगेच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. दगडफेक करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. धुळवडीदिवशी बुरखासदृश कपडे घालून नाचल्याच्या घटनेचा सूड उगवण्यासाठी आपण दगडफेक केल्याची कबुली त्याने दिली आहे. स्थानिक तरुणांनी यासीरला पकडल्यानंतर या घटनेसंदर्भात त्याने माफीही मागितली आहे. धुळवडीच्या दिवशी 14 मार्च रोजी दुपारी टेंगिनकेरा गल्ली परिसरात बुरखा घालून एका अल्पवयीन मुलाने डान्स केला होता. यासंबंधी मार्केट पोलीस स्थानकात एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. याच घटनेचा राग मनात ठेवून त्या तरुणाने दगडफेक केल्याची कबुली दिली आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नये
शहराच्या शांततेला सुरुंग लावण्याचे प्रयत्न अधूनमधून सुरू आहेत. मात्र, पोलिसांनी वेळीच अशा घटनांची दखल घेत कारवाई सुरू केल्यामुळे समाजकंटकांचे प्रयत्न फोल ठरत आहेत. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत अफवांवर विश्वास ठेवू नये, दगडफेकीच्या घटनेनंतर परिस्थिती पूर्वपदावर आली असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.









