प्रवाशावर हल्ल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ मदुराई
अण्णाद्रमुकचे अंतरिम महासचिव आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एडप्पदी पलानीस्वामी यांच्यासह 6 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मदुराई विमानतळावर एका प्रवाशावर कथितपणे हल्ला केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी सध्या तपास सुरू आहे. संबंधित प्रवाशाने पलानीस्वामी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. या प्रवाशाला पोलिसांनी अटक केली आहे.
शिवगंगई येथे अण्णाद्रमुकच्या बैठकीत भाग घेतल्यावर पलानीस्वामी हे चेन्नईहून मदुराईसाठी रवाना झाले होते. याचदरम्यान विमानतळावर एका प्रवाशाने त्यांच्या विरोधात घोषणा देत व्ही.के. शशिकला यांचा ‘विश्वासघात’ केल्याचा आरोप केला होता.
पलानीस्वामी हे स्वतःचे सुरक्षा अधिकारी कृष्णन यांच्यासोबत विमानातून उतरल्यावर टर्मिनल भवनच्या दिशेने जात असताना या प्रवाशाने घोषणा दिल्या होत्या. तसेच या घटनेचे तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह स्ट्रीमिंग करत होता. या व्हिडिओत पलानीस्वामी यांना घोषणाबाजी करणाऱया व्यक्तीकडून मोबाइल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात.









